मुंबईः इकडे विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिला. आता चर्चा आहे ती राज्यात सत्तापालट होणार की काय याची. तशी संधीच काँग्रेसनं दिल्याची भीतीही आघाडीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळतेय. त्यातच शाह आज सिंधुदूर्गात आहेत. त्यामुळे राजकीय चर्चा झडणं स्वाभाविक असून आघाडीला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती? असल्याचे बोलले जात आहे.
फासे, निवडणूक आणि गणित
आघाडीनं 169 आमदारांसह विधानसभेत बहुमत सिद्ध केलं आहे. त्यानंतर काँग्रेसकडून नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्षही झाले. आता पुन्हा विधानसभेत अध्यक्षाची निवड होईल त्यावेळेस बहुमताचीही कसोटी लागेल. म्हणजे एका अर्थानं पुन्हा एकदा आकडे सिद्ध करावे लागतील. आघाडीचे नेते विश्वास जरी व्यक्त करत असले तरी सुद्धा निवडीत एक दोननं जरी कमी जास्त झालं तर ठाकरे सरकाची प्रतिमा धोक्यात येऊ शकते.
देवेंद्र फडणवीस यांनी शिडी न लावता फासे पलटवू असं म्हटलं आहे. त्यानंतर आता अमित शाह महाराष्ट्रात येत आहेत. नारायण राणेंनी तर शाहांच्या पायगुणांनी हे सरकार जावं असं म्हटलं आहे. राणे पहिल्यापासूनच हे सरकार पाडण्यासाठी किंवा ते खिळखिळं करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशी वारंवार ते वक्तव्यही करतात. त्यामुळे अध्यक्ष निवडताना आघाडीला धक्का देण्याची संधी आल्याचं विरोधकांना वाटतं आहे.