सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवास थाटात प्रारंभ!
सोलापूर, दि. 1- आपल्या देशात स्पर्धा परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी बनण्याचे युवकांमध्ये क्रेझ आहे. आता त्यासोबतच युवकांनी स्टार्टअपकडे लक्ष केंद्रित करून आपल्या कल्पनाशक्तीला चालना देऊन छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय उभे करून उद्योजक बनण्याचे स्वप्न अंगीकारावे, असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
मंगळवारी, वडाळा येथील लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. बी. पी. रोंगे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. लोकमंगल संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी यंदा या महोत्सवात 62 महाविद्यालयांमधून 1800 विद्यार्थी सहभागी झाल्याचे सांगितले. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 39 कलाप्रकारांचेही सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, विद्यार्थी कलाकारांनी युवा महोत्सवातील प्रत्येक कलाप्रकारात सहभाग घेऊन आनंद लुटावा. चांगली कला सादर करून टॅलेंट सिद्ध करावे. त्यासोबतच युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक दिवस आत्मपरीक्षण करावे. आपल्या क्षमतेचेही निरीक्षण करावे. संवाद कौशल्य देखील खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगले संवाद असणे फार महत्त्वाचे असते. उद्योजक बनण्याचे स्वप्न विद्यार्थ्यांनी पाहावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, स्पर्धा म्हटले की, विजय-पराजय येतो. मात्र सहभाग हाच खरा विजय असतो. 39 कला प्रकारांचा सहभाग असलेला हा युवा महोत्सव युवा विद्यार्थी कलाकारांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. कलाकारांना चांगले व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येते. सोबतच स्टार्टअपसाठी देखील विद्यापीठ नेहमी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बनण्याकडे लक्ष द्यावे. स्वतः उद्योजक होण्याचे स्वप्न बघून त्या दृष्टीने प्रयत्न करावे. आज विद्यापीठाला पंतप्रधान उच्च सतर शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या 100 कोटी रुपये निधीमधून विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार सुभाष देशमुख म्हणाले की, स्टार्टअपबाबत
विद्यार्थी व शिक्षकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांना व कौशल्यांना वाव देऊन उद्योजक बनण्याकडे लक्ष द्यावे. शासनाच्या पर्यटन तसेच विविध महामंडळाकडून पर्यटन व उद्योग उभारण्यासाठी बिगरव्याज वित्त पुरवठा होतो. त्याचा लाभ युवकांनी घ्यावा. सुदैवाने आज आपल्या जिल्ह्यासाठी एकमेव विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने व येथील विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी करावी की, ज्यामुळे संपूर्ण जगात नावलौकिक प्राप्त व्हावे. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशा सदिच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने झाली तर राष्ट्रगीताने समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. सतीशकुमार देवकर यांनी मानले.
वडाळा: लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालय येथे आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, आमदार सुभाष देशमुख, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, रोहन देशमुख, प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. केदारनाथ काळवणे व अन्य.