पुणे : रासपचे नेते महादेव जानकर महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना अजित पवार गट पाठिंबा देणार, बारामतीचा उमेदवार बदलणार या चर्चांवर आता स्वतः अजित पवारांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रवादीने महादेव जानकरांना पाठिंबा दिला ही विरोधकांनी पसरवलेली अफवा असल्याचं सांगत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी सांगितलं.
राज्यातील महायुतीच्या जागावाटप अद्याप जाहीर झालं नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आजच्या पुण्यातील बैठकीत बारामती, शिरूर, सातारा , धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. परभणीचा उमेदवार दोन दिवसात ठरणार. महादेव जानकर यांना राष्ट्र्वादी पाठिंबा देणार ही केवळ अफवा असून ती विरोधकानी पसरवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही.