येस न्युज मराठी नेटवर्क : निरामय दीर्घायुष्यसाठी आजच्या वैज्ञानिक युगातही आयुर्वेदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज भौतिक साधनांची व सोयी सुविधांची विपुल उपलब्धता आहे त्यामुळे माणूस हा भौतिक साधनांच्या सवयीमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक रोगांचा अकाली प्रादुर्भाव वाढल्याने गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, टाचदुखी, स्पोंडीलिसिस, खांदेदुखी यासारखे वातविकार वाढत आहेत. यावर होणारी शस्त्रक्रिया व खर्च मोठ्या प्रमाणावर आहे. यावर अग्निकर्म पद्धतीने उपचार केल्यास कायमची सुटका होऊ शकते या उदात्त हेतू घेऊन शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय व जागतिक आयुर्वेद काँग्रेस व नस्या यांच्या संयुक्त विद्यमाने आज अग्निकर्म या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आजचे प्रमुख वक्ते व तज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकुमार देशमुख, जागतिक आयुर्वेद परिषदेचे समन्वयक व NCISM इथिकल कमिटी सदस्य डॉ. नारायण जाधव, प्रमुख पाहुणे डॉ. कौशिक दाते, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, प्राचार्या डॉ. वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ.शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी श्री, अनुप दोशी, कार्यशाळा समन्वयिका डॉ. शिल्पा येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व धन्वंतरी स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिल्पा येरमे यांनी केले यामध्ये कार्यशाळेच्या आयोजनाबद्दलचा हेतू सांगून संस्थेची माहिती सांगितली.
यानंतर परिषदेचे समन्वयक डॉ. नारायण जाधव यांनी आचार्य सुश्रुत यांच्या सिद्धांतानुसार भैषज, क्षार, अग्निकर्म व शस्त्र या उपायानुसार सगळ्याच आजारात आयुर्वेद सिद्धांत पाळण्यासाठी अग्निकर्म केला जातो असे सांगितले. व गोवा येथे होणाऱ्या 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेचे महत्त्व व परिषदेची माहिती सांगितली. ही परिषद आयुर्वेदाची चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयुष्य विभागाच्या सहकार्याने वेदा पासून पूर्ण तंत्रज्ञानापर्यंत भारतीय चिकित्सा पद्धतीचा जगभर प्रचार व प्रसार करण्यासाठी करीत असल्याचे मत आपल्या भाषणात मांडले.
डॉ. कौशिक दाते यांनी आपल्या भाषणात राग, मोह, विकार,रिपू यावर विजय मिळवून खुल्या मनाने आपल्याकडील ज्ञान जनसामान्यांच्या उपयोगासाठी कसे पोहोचविता येते, पा अनुबोधन आणि अनुष्ठान या त्रयींचा वापर चिकित्सेसाठी करा असे विचारले मांडले.
यानंतर आजचे प्रमुख तज्ञ मार्गदर्शक डॉ. चंद्रकुमार देशमुख यांनी संपूर्ण दिवसभर कार्यशाळेच्या माध्यमातून अग्निकर्म याचा इतिहास याचा उपयोग कोणत्या कोणत्या आजारावर उपयोगी ठरते याची माहिती दिली व प्रत्यक्षपणे प्रत्येक आजारावर रुग्णावर अग्नीकर्म करून प्रत्यक्ष दाखविले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील विविध भागातील डॉक्टर्स, पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कल्पना पांढरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व रुग्णालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.