नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देत असलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाला भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोसच्या मैदानात गवसणी घातली. या विजयामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेतील जेतेपद मिळवण्यासाठीची भारताची 17 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात एकच जल्लोष झाला. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट बार्बाडोसला फोन फिरवून भारतीय संघाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारतीय संघाशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी मोदींनी रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमप्रकारे सांभाळल्याबद्दल शाबासकी दिली. तर विराट कोहलीने अंतिम सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना केलेल्या 76 धावांच्या खेळीचे कौतुक केले. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. काल विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ट्वेन्टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती.