अभिनेते डॉ गिरीश ओक यांची शिरीष देखणे घेणार प्रकट मुलाखत
सोलापूर,- प्रिसिजन वाचन अभियान कार्यक्रमात येत्या शनिवारी, ०७ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेते डॉ गिरीश ओक यांच्या ‘मी कोण माझ्यातला’ या पुस्तकाचे डॉ सुहासिनी शहा यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन कार्यक्रमास जेष्ठ चित्रकार रविमुकुल, प्रकाशक अनिल कुलकर्णी व शिरीष देखणे उपस्थित राहणार आहेत.
“ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’ यासारख्या अनेक मालिका म्हटलं की डोळ्यांसमोर एक नाव हमखास येतं, ते म्हणजे डॉ. गिरीश ओक. टीव्हीच्या मालिकांमध्ये ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतले ‘नाना’, अगंबाई सासूबाई’ या मालिकेतले शेफ अभिजित राजेंना तरी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं..ते डॉ. गिरीश ओक.
“तो कोणी माझ्यातला” डॉ गिरीश ओक यांचे हे पुस्तक म्हणजे केवळ एका नटाचे स्मरणरंजन नाही, तर हा एक कॅलिडोस्कोप आहे. तो जसा फिरवला की तशी नक्षी बदलते त्याचप्रमाणे या पुस्तकात वाचकांना कधी नामवंत रंगकर्मींचा परिचय घडतो तर कधी व्यवसायिक नाटक प्रेक्षकांपर्यंत नेताना करावी लागणारी धडपड दिसते, तर कधी पडद्यामागे घडणाऱ्या गमतीजमतीचे दर्शन घडते. हा निव्वळ स्वकर्तृत्वाचा लेखाजोखा नसून मराठी रंगभूमीच्या इतिहासातील काळाच्या एका रसरशीत इंद्रधनुषी अंश आहे. हे पुस्तक म्हणजे एका रंगकर्मीने स्वतःचे तठस्थ दृष्टीने केलेले अवलोकन आहे.
प्रिसिजन वाचन अभियानमध्ये या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर अभिनेते डॉ गिरीश ओक यांची शिरीष देखणे घेणार प्रकट मुलाखत हे घेणार आहेत.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजता हा कार्यक्रम होईल.