टेंभुर्णी : भिमानगर (ता. माढा) येथे ढवाळ जेवणाच कार्यक्रम आटोपून परत माघारी येताना मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतामध्ये एका युवकासह दोन महिलांचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली, मात्र याबाबतची माहिती सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पोलिसांनी माध्यमांना सांगितली.
महादेव रमेश ताकमोगे (वय २२ वर्षे, रा. डिकसळ ता. मोहोळ सध्या रा. टेंभुर्णी ता. माढा)़ सुषमा प्रकाश पवार (वय ४० वर्ष), महानंदा विकास पवार (वय ४५ दोघी रा. देगांव ता. मोहोळ) हे मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४५ जे ८१०६ यावरून भिमानगर (ता. माढा) येथून ढवाळ जेवणाच कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर २३ रोजी रात्री उशीरा १२ नंतर टेंभुर्णीकडे माघारी येत असताना सोलापूर – पुणे महामार्गावरील शिराळ (ता. माढा) गावाच्या हद्दीत जय मल्हार हॉटेलसमोर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत महादेव ताकमोगे याचा नुकतेच लग्न जमले होते. तो टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीत पान टपरी चालवत होता.