मनपा आयुक्त शीतल उगले-तेली यांनी दिली माहिती
सोलापूर : सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने मिळकत, नळ कनेक्शन यासह विविध घटकांचा सर्वंकष असे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला असून आज त्या अनुषंगाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांनी उपस्थित असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित उपायुक्त मछिंद्र घोलप, सहायक आयुक्त पुष्पगंधा भगत, सहायक आयुक्त विक्रमसिहं पाटील, नगर अभियंता लक्ष्मण चालवादी, कर संकलन प्रमुख युवराज गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे सर्वंकष असा मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माध्यमातून महापालिकेकडे सोलापूर शहरातील मिळकती संदर्भात संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सर्वंकष सर्वेक्षण संदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध असा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
महापालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील सर्व मिळकती, नळ कनेक्शन, ड्रेनेज कनेक्शन, प्रॉपर्टी कार्ड, बांधकाम परवाना, वापर परवाना, कर आकारणी यासह इतर सर्व माहिती या सर्वेक्षण अंतर्गत संकलित करण्यात येणार आहे.घरोघरी जाऊन या सर्वेक्षणातील पथके माहिती संकलित करणार आहेत सोलापूर शहर हद्दवाढ व ग.ऊ सु विभाग या सर्वत्र हा सर्वे करण्यात येणार आहे.या महत्त्वपूर्ण अशा सर्वेक्षणासाठी एकूण 113 पथके तयार करण्यात आली आहेत. हे पथक घरोघरी जाऊन सर्व माहिती संकलित करणार आहेत. त्यानंतर सर्व डाटा एकत्रित करण्यात येईल. ही माहिती गुगल फॉर्म मध्ये भरण्यात येणार आहे. साधारणता : एक पथक रोज 50 घरांचा सर्व्हे करणार आहेत. एकूण 113 पथके हे काम पाहणार आहेत. साधारणतः तीन महिन्यात हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येईल.या सर्वेक्षणासाठी घरोघरी आलेल्या पथकाकडून संबंधित मिळकतदारांना आवश्यक असलेली माहिती विचारणार आहेत. त्यामध्ये मिळकत कर नोंद आहे का ? बांधकाम परवाना आहे का? वापर परवाना आहे का ? नळ कनेक्शन आहे का? त्यामध्ये घरगुती की व्यवसायिक ? ड्रेनेज कनेक्शन आहे का? या संदर्भातली माहिती कर्मचारी जाणून घेणार आहेत. ती माहिती गुगल फॉर्म मध्ये संबंधित पथक भरणार आहे. हा गुगल फॉर्म तयार करण्याचं काम संगणक विभाग करणार आहे.
सर्वेक्षण पथकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व माहिती मिळकतदारांनी द्यावयाची आहे. ही माहिती देतानाच टॅक्स पावती, बांधकाम परवाना, वापर परवाना आदी महत्त्वाची कागदपत्रे ही या पथकास दाखविणे गरजेचे आहेत. जर कागदपत्र दाखवले नाहीत तर संबंधित बाब अनधिकृत असल्याचे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी आलेल्या पथकास आवश्यक ती कागदपत्रे दाखवावी. त्याचा फोटो पथक घेईल. यासाठी सर्वांनी महापालिकेच्या पथकास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.