सोलापूर, दि. १०- सोलापूरची आराध्य देवता प्रसिद्ध असलेल्या रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस महिलांची गर्दी वाढत आहे. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलला आहे.
शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी देवीची अलंकार पूजा व मसरे यांच्या घरापासून सायंकाळी सहा वाजता दहीहंडी मिरवणूक वाजत गाजत निघणार आहे.
गुरुवारी, सप्तमी व अष्टमी असल्याने मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी दहा वाजता श्रीखंड, दूध, ड्रायफूट्स व उसाचे रसाचे अभिषेक करून महापूजा करण्यात आली. त्यानंतर दुर्गाष्टमीला अलंकार पूजा होऊन विधिवत होमहवन करण्यात आले. रात्री देवीच्या महापूजानंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते. ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ रामप्पा मसरे , सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदी उपस्थित होते.
दैनंदिन काम, वाढत्या उन्हामुळे दर्शनासाठी महिलांची गर्दी पहाटे व सायंकाळीच्या सुमारास जास्त प्रमाणात दिसून येत आहे. पहाटे ४ ते ५ वाजताही महिला दर्शन रांगेत दिसून येत असून, शहरातील रस्त्यावर महिलांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत.
देवीच्या दर्शनासाठी पहिल्या माळेपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी दिसून येत आहे. याशिवाय महिला भाविक धार्मिक कार्यक्रमासही आवर्जून हजेरी लावत आहेत. नवरात्रीनिमित्त महिला उपास करत आहेत. फराळाचे साहित्य खरेदी करत नवरात्रीचा आनंद महिला द्विगुणित करीत आहेत.
रुपाभवानी माता मंदिरात शहरातील शेळगी, बाळे, पूर्व विभाग, एसटी स्टॅण्ड परिसर, बाळीवेस, कुंभार वेस, भवानी पेठ, अशोक चौक, अक्कलकोट रोड, तुळजापूर रोड, पुणे रोड, मंगळवेढा रोडवरील भाविक दर्शनासाठी गर्दी करीत आहेत.
सकाळी नित्योपचार पूजा, आरती झाल्यानंतर सकाळपासून देवीच्या या रूपाचे दिवसभर हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. पार्वतीचे रूप म्हणजे श्री रुपाभवानी देवी. देवीचे हे रूप अत्यंत मनमोहक आहे. दररोज नियमित रुपाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधिवत पार पाडले जात आहे.
अनवाणी पायांनी राहण्याचे फायदे
नवरात्रीच्या काळात बरेच भाविक नवस म्हणून अथवा कोणती तरी इच्छा पूर्ण व्हावी या हेतूने अनवाणी पायी चालतात. कोणी नऊ दिवस तर कोणी कोजागरी पोर्णिमेपर्यंत अनवाणी पायी चालतात. अनवाणी पायी चालल्याने रक्तपुरवठा सुरळीत होतो शिवाय अन्य आरोग्याच्या समस्या दूर होतात. शुगर असलेल्या लोकांनी अनवाणी पायी चालू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.