गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयत्या गॅंगने मोठी दहशत माजवली आहे.
कॉंग्रेसचे नेते गणेश जगताप यांच्यावर कोयत्या गॅंगने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सासवड येथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी जगताप यांनी पाच हल्लेखोरांविरोधात सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास गणेश जगताप त्यांच्या कार्यालयात बसले असताना त्यांचा मुलगा प्रेम जगतापही तिथे आला. पाच ते सहा मुले चारचाकी गाडीतून आपला पाठलाग करीत असल्याचे प्रेमने वडिल गणेश जगताप यांना सांगितले. त्यानंतर प्रेमची चारचाकी गाडी घेऊन फिर्यादी गणेश जगताप घरी जाण्यास निघाले. गणेश जगताप कार ‘पार्क’ करत असताना कोयता गॅंगमधील तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्याकडे धारदार कोयते, लाकडी दांडक्यांनी जगतापांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत जगताप गाडीतच बसून राहिले. यात हल्लेखोरांनी त्यांच्या कारची मोठी तोडफोड केली.
‘आमच्या मटक्याच्या धंद्यात आडवा येतोस?, तुझ्यामुळे आमचं नुकसान झालं, तुला आज जिवंत सोडणार नाही,’ असे म्हणून हल्लेखोरांनी कारवर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी अचानक गणेश जगताप यांनी त्यांच्या जवळील पिस्तूल काढली, हे पाहताच हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
‘गिरीश महाजन करू शकले नाही ते करू’ गणेश जगताप यांनी सासवड परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीच्या रागातून ‘कोयता गँग’ने माजी जगताप यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सूरज ऊर्फ बिट्टू चंद्रकांत माने, ओंकार जाधव, सनी माने, अनिकेत जाधव, श्रीजय जाधव यांच्यासह अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गॅंगमधला सूरज माने राजकीय पदाधिकारी आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.