हिंगोली : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्याला मारहाण करून शिवीगाळ केली होती. शिवाय सीसीटीव्हीची तोडफोड करून नुकसान केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आमदार बांगर यांच्यासह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर शनिवारी (ता. २८ जानेवारी) गुन्हा दाखल झाला आहे.
शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक लक्ष्मीशंकर उपाध्याय यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील पाच अधिव्याख्याता यांनी फिर्यादी (प्राचार्य उपाध्याय) हे आम्हाला विनाकारण त्रास देतात. संध्याकाळी सात वाजतापर्यंत मीटिंग घेतात. त्यामुळे आम्हाला येण्या-जाण्याकरिता त्रास होतो, असे आमदार बांगर यांना सांगितले. त्यामुळे आमदार बांगर, शंकर बांगर व ३० ते ४० कार्यकर्त्यांसह पाच अधिव्याख्यातांनी कक्षात येऊन प्राचार्य उपाध्याय आणि त्यांच्या साक्षीदारास शिवीगाळ करून मारहाण केली.
शासकीय कामात अडथळा निर्माण केला. शिवाय प्राचार्यांच्या कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करून पाच हजार रुपयांचे नुकसानही केले आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे. प्राचार्य उपाध्याय यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आमदार बांगर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. नोंद केला. फौजदार मगन पवार तपास करीत आहेत.
महिलेची तक्रार आल्याने जाब विचारला
याबाबत आमदार संतोष बांगर म्हणाले की, ‘मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवर अन्याय केला होता. महिलेवर अन्याय सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा नोंद झाला तरी त्याची पर्वा नसेल. माझ्याकडे महिलांची तक्रार आल्याने जाब विचारला.’