सोलापूर, दि. 26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने ‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाची अतिरिक्त संधी मिळणार आहे.
‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदने सादर केली होती. त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठित केली. सचिव म्हणून विद्यापीठाचे कायदा अधिकारी जे. एम. खरेदी यांनी काम पाहिले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना कोणतीही पदवी व पदव्युत्तर पदवी ही विहित कालावधीत म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर दोन वर्षे कालावधीमध्ये पूर्ण करावी लागेल, असे कळवून त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना पाठवलेले आहे. मात्र काही विद्यार्थ्यांचे आपल्या पदवी व पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये देखील संबंधित पदवीचे शिक्षण पूर्ण झाले नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक जणांनी विद्यापीठाशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावून अडचण दूर करण्याची व उच्च शिक्षण घेण्याची संधी देण्याची विनंती केली होती.
प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्याकडून समितीचे अभिनंदन
विद्यापीठ अनुदान आयोगाचे तसेच कायद्याचे विविध अधिनियम तपासून व अधिकार पाहून या विद्यार्थ्यांसाठी समितीने एक दिलासादायक निर्णय घेतला. त्यानुसार आता तळागाळातील विद्यार्थ्यांना एक वर्षे आपली राहिलेली पदवी पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. आपल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना बसून उच्च शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्णसंधी ही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचा सुमारे 600 हून अधिक विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यानिमित्त समितीचे अभिनंदन प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.