येस न्युज मराठी नेटवर्क : तुम्ही नेहमी ट्रेनने प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सामान्यपणे ट्रेनने प्रवास करताना सामान घरापासून ट्रेनपर्यंत नेण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता सामान ट्रेनपर्यंत नेण्याची जबाबदारीही रेल्वेने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेने आता प्रवाशांचं सामान थेट घरापासून ट्रेनपर्यंत पोहचण्याची सेवा देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्हेशन करुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं सामन थेट त्यांच्या सीटपर्यंत नेऊन देण्याची सेवा भारतीय रेल्वेने सुरु केली आहे. या सेवेचा लाभ ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे.
भारतीय रेल्वेने सुरु केलेली ही सेवा सध्या अहमदाबाद विभागामध्ये पायलेट प्रोजेक्ट म्हणून सुरु करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना www.bookbaggage.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच bookbaggage च्या अॅपच्या माध्यमातूनही या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
वेबसाईट किंवा अॅपवर नोंदणी केल्यानंतर प्रवाशांना आपल्या रेल्वे आरक्षणासंदर्भातील माहिती आणि सामानासंदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे.या सेवेसाठी सामानाचा आकार आणि वजनावरआधारीत शुल्क द्यावे लागणार आहे. ५० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत शुल्क या सेवेसाठी आकरण्यात येईल.