पुण्यात 94, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 76 ठिकाणी आग; अग्निशमन दलाची रात्रभर धावपळ
येस न्यूज नेटवर्क : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा उत्साह सुरू असतानाच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन्ही शहरांमध्ये एकूण 170 आगीच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये पुणे शहरातील 94, तर पिंपरी-चिंचवडमधील 76 घटनांचा समावेश आहे.
फटाक्यांमधून उडणाऱ्या ठिणग्या, ज्वलनशील वस्तू आणि उघड्यावर ठेवलेल्या साहित्याला आग लागल्याने अनेक ठिकाणी अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
दिवाळीच्या आनंदोत्सवात आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. फटाके फोडताना आवश्यक खबरदारी न घेतल्यास मोठ्या दुर्घटना घडू शकतात, हे या घटनांमधून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखणे, ज्वलनशील वस्तूंपासून दूर राहणे आणि अग्निसुरक्षेचे नियम पाळणे आवश्यक आहे.











