शिक्षकदिनी राष्ट्रपतीच्या हस्ते होणार गौरव.
सोलापूर : शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूरचे प्राचार्य डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२६ साठी निवड झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. नरोटे यांनी इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केले असून इमेज प्रोसेसिंग, बायोमेट्रिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी त्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन, संशोधनाला प्रोत्साहन आणि तंत्रशिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्राध्यापकांमध्ये डॉ. विक्रम विशाल, डॉ. अमर तकसांडे यांच्यासह डॉ. संदीपान नरोटे यांची निवड झाली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिनांक 5 सप्टेंबर रोजी त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या या यशामुळे सोलापूरचा नावलौकिक वाढला आहे.









