सोलापूर: सोलापूर येथील माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेच्या वतीने श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘तीज री रीत’ हा अत्यंत देखणा, पारंपरिक आणि सांस्कृतिक सोहळा २२ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक माहेश्वरी सांस्कृतिक भवन येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. युवती शाखेच्या संपूर्ण पदाधिकारी, कार्यकारी समिती आणि सर्व सदस्यांनी अत्यंत समर्पित भावना, अपार कष्ट आणि उत्कृष्ट टीमवर्कच्या जोरावर हा सोहळा कमालीचा यशस्वी केला. या उपक्रमाद्वारे त्यांनी माहेश्वरी संस्कृतीचा समृद्ध वारसा आणि तीजबद्दलची सांस्कृतिक परंपरा अतिशय सुंदर पद्धतीने जपली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित महिलांनी परिधान केलेल्या आकर्षक ‘लहरिया’ ड्रेस कोडमुळे संपूर्ण सभागृह पारंपरिक रंगात न्हाऊन निघाले होते.
या दिमाखदार सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षा स्नेहा पवनजी सोनी आणि सचिवा तारा मिलिंदजी मर्दा उपस्थित होत्या. त्यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकारी समिती सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि युवती शाखेच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या विविध स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून बीड येथील सौ. अंकिता महेशजी मंत्री, सौ. अनुराधाजी चांडक आणि मिस लक्ष्मी नाहनाथजी बुरा यांनी उपस्थित राहून अत्यंत चोख आणि पारदर्शक जबाबदारी पार पाडली.
सासू-सून जोडीने मारली बाजी; ‘क्वीन्स ऑफ बॉलिवूड’ थीमवर रंगली नृत्य स्पर्धा!
महिलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘मिसेस तीज स्पर्धा’ (Mrs. TEEJ Competition) चे नेटके व शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी नेहा प्रितम मुंदडा आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. या स्पर्धेत कौटुंबिक जिव्हाळा जपणारी ‘मिसेस तीज सासू-सून जोडी’ चा बहुमान सुन मोणिका श्रेयसजी मर्दा आणि सासू सविता गोकुळजी मर्दा यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरण आणि उत्तम समन्वयाने पटकावला.त्याचप्रमाणे, उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी यंदाची ग्रुप डान्स स्पर्धा ‘क्वीन्स ऑफ बॉलिवूड’ (Queens of Bollywood) या विशेष संकल्पनेवर आधारित होती. या स्पर्धेत अटीतटीची चुरस पाहायला मिळाली. स्पर्धेचे बहारदार आयोजन सौ. स्नेहल अभिजीत कारवा आणि त्यांच्या टीमने केले होते. यामध्ये बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री ‘वैजयंती माला’ यांच्या अजरामर गीतांवर आणि शैलीवर हुबेहूब नृत्य सादर करून सोनाली मिथिलेशजी बलदवा आणि त्यांच्या ग्रुपने (वैजयंती माला ग्रुप) प्रथम क्रमांकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले.
आकर्षक मनमोहक सजावट आणि उत्कृष्ट नियोजन!सभागृहात प्रवेश करताच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अत्यंत देखणी, कलात्मक आणि मनमोहक सजावट श्रुतिका नितीन सोनी आणि त्यांच्या डेकोरेशन टीमने साकारली होती.
या संपूर्ण महोत्सवाचे नेटके नेतृत्व युवती शाखेच्या अध्यक्षा सौ. कोमल राहुल चंडक, सचिवा मयुरी केतन भुतडा, उपाध्यक्षा रुपाली प्रशांत तापडिया आणि कोषाध्यक्षा ज्योती संदीप असावा यांनी केले. कार्यक्रमात लावण्यात आलेले पारंपरिक मेहंदी, गजरा, बांगड्या आणि चिरमीचे स्टॉल्स तसेच महिलांसाठीचे मजेशीर खेळ (Fun Games) व आकर्षक सरप्राईज प्राईजेसमुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. युवती शाखेच्या या अभूतपूर्व आयोजनाचे आणि उत्तम नियोजनाचे संपूर्ण सोलापूरच्या माहेश्वरी समाजात कौतुक होत आहे.








