पंढरपूर : वारकरी संप्रदायाच्या सर्व समन्वय प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावत महाराष्ट्र शासनाने कार्तिकी यात्रेसाठी आषाढी वारी प्रमाणे कठोर निर्बंध लादले आहेत.या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रा समन्वय समिती ने अगोदरच जाहिर केल्या प्रमाणे येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणूक मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर करण्यात येत आहे.त्याची सुरुवात येत्या पदवीधर मतदार संघाचे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.कार्तिकी वारीत पंढरपुर स्थित सर्व फडकरी महाराज मंडळींना भजन कीर्तनाचे नियम पार पाडावयाचे असल्याने हि कार्तिकी यात्रा झाल्याबरोबर ज्या पदवीधर मतदार संघात निवडणूक आहे त्या त्या ठिकाणी जाऊन मतदान प्रक्रीयेवर वारकरी,व विठ्ठल भक्तांनी बहिष्कार टाकत मतदान करु नये असा प्रचार दौरा करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर वारकरी संप्रदायाला एवढे निर्बंध असतील तर कार्तिकी एकादशीची श्रीविठ्ठलाच्या महापुजेला बाहेरुन कोणीही न येता हि महापूजा प्रांताधिकारी यांच्या हस्ते करावी असे वाटते.आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने सहकार्य केले असताना तसेच या कार्तिकी यात्रेसाठीसुद्धा अत्यंत मर्यादित संख्येने यात्रा भरवण्याचा योग्य प्रस्ताव देऊनही शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा असताना शासन तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे दिसून आल्याने अत्यंत दुःखद अंतःकरणाने हि भुमिका जाहीर करत आहोत.
यावेळी कार्तिकी यात्रा समन्वय समितीचे ह.भ.प.श्री.देवव्रत(राणा) महाराज वासकर,ह.भ.प.श्री.संजय महाराज देहूकर, ह.भ.प.श्री.निवृत्ती महाराज नामदास,ह.भ.प.भागवत महाराज चवरे,ह.भ.प.श्री.विष्णू महाराज कबीर,ह.भ.प.श्री.एकनाथ महाराज हंडे, ह.भ.प.श्री.रंगनाथ(स्वामी) महाराज राशिनकर,ह.भ.प.श्री.मोहन महाराज बेलापूरकर,ह.भ.प.श्री.जगन्नाथ महाराज देशमुख,ह.भ.प.श्री.सुधाकर महाराज इंगळे , ह.भ.प.श्री.रामकृष्ण हनुमंत महाराज वीर आदी उपस्थित होते .