सोलापूर – ( प्रतिनिधी ) – दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिक खंडाच्या बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या स्कूआ या वैशिष्ट्यपूर्ण पक्षावरील संशोधक व नांदेड येथील संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्कूल ऑफ लाइफ सायन्स (प्राणीशास्त्र) विभागाचे प्रमुख व डॉ. शिवाजी चव्हाण यांनी सोलापूर आसपासच्या माळराने व जलाशय या ठिकाणी भ्रमंती करून पक्षांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ.अरवींद कुंभार, वन्यजीव छायाचित्रकार शिवानंद हिरेमठ व ऋतुराज कुंभार यांनी सहभाग नोंदवला.
यावर्षी बरसलेल्या दमदार पावसामुळे सोलापूर भोवती व्यापलेला माळरानावर गवत अतिशय जोमाने वाढले असून माळावर अधिवास गाजवणारे नाना त-हेचे पक्षी आनंदात नांदत आहेत. नान्नज अभयारण्य परिसरात यंदा अतिशय पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे जिल्ह्याचे शान असलेला माळढोक पुन्हा आपली अस्तित्व दाखवेल असा अंदाज या पक्षी अभ्यासांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांच्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात याठिकाणी पावसाळी स्थलांतरित शिकारी पक्ष्यांबरोबर स्थानिक ससाणे, घारी, खाटिक इत्यादी पक्षी सध्या गणिनीय संख्येत गवताळ प्रदेशात कीटक मटकावताना नजरेस पडतात. माळरानावरचा वैभव असलेले भटतितर, धाविक, माळटिटवी, दयाळ, गप्पीदास, कोतवाल, विविध प्रकारचे चंडोल, लावा, तितर, होला, सातभाई, मुनिया, वेडाराघू इत्यादी पक्षी बहुसंख्येने सध्या गवतावरील कीटकखाद्य टिपताना सक्रिय असल्याचे दृश्य पाहायला मिळते. दमदार पावसामुळे माळरानावरील वगळी व ताली पाण्याने भरल्यामुळे या छोट-छोट्या पाणवठ्यावर रंगीत करकोचे, चमचे चोच, पांढऱ्या मानेचा करकोचा, काळा व पांढरा कुदळे, हळदीकुंकू बदक, पाण कावळे, बगळे इत्यादी पाणपक्षीही गर्दी करून वावरताना दिसतात. उत्तरेकडून पावसाळ्याच्या प्रारंभी हमखास येणारे तीन प्रकारचे चातक व युरोपियन नीलकंठ इत्यादी स्थलांतरित पक्षी सध्या सोलापूर भोवती गर्दी करून वावरत आहेत.
सोलापूर शहराभोवती असलेल्या विस्तीर्ण माळरान व हिप्परगा जलाशय हे जैवविविधतेसाठी महत्वाचे स्थान आहेत. जैवविविध्य जसेनतसे टिकवून ठेवायचे असेल तर त्यांचा अधिवास व नैसर्गिक वावरात अडथळा निर्माण होऊ नये या दृष्टीने सर्वांनी पाऊल उचलले पाहिजे. दिवसेंनदिवस -हास होत चाललेल्या पक्षी व वन्यप्राण्यांची संख्या टिकून राहायला पाहिजे. – डॉ. शिवाजी चव्हाण, संत रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
— अतिशय पोषक वातावरण —
यावर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे जिल्हातील माळराने व पाणवठ्यावर पक्ष्यांच्या वापरासाठी अतिशय पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पाहुणे पक्षी जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणी येऊन दाखल होतील. सद्या पक्षी निरीक्षक तथा वन्यजीव छायाचित्रकारांची संख्या पण गणनीय आहे. त्यांनी निसर्गभ्रमंती करताना निसर्गातील घटकांना हानी पोहचवू नये या दृष्टीने शास्त्रोक्त पद्धतीने वावरले पाहिजे.
– डाॅ. अरविंद कुंभार,जेष्ठ पक्षी अभ्यासक –