एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद..
माढा तालुक्यातील तांबे वस्ती येथे पूर परिस्थितीने पाण्यात अडकलेल्या शेतकरी कुटुंबाला जिल्हाधिकारी यांनी स्वतः थांबून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले
मोहोळ तालुक्यातील 3 तर माढा तालुक्यातील 4 मंडळात 14 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली..
सोलापूर – जिल्ह्यात 10 सप्टेंबर रोजी उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात अतिवृष्टी झालेली होती तर 14 व 15 सप्टेंबर रोजी मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे घरांचे व अन्य बाबींचे नुकसान झालेले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच तालुका प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.




जिल्हाधिकारी आशीर्वाद हे आज दुपारी मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले. तसेच कोळेगाव आष्टी बंधाऱ्यातून सीमा नदी मध्ये पाणी सोडल्याने नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीचे पंचनामे लवकर करण्यात येतील. तसेच लवकरात लवकर शासकीय मदत आपल्याला मिळेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे सांगितले.
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी, रोपळे, म्हैसगाव व रांजणी या चार मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कुर्डूवाडी जवळील अतिवृष्टीने ऊस पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच केळी बागेच्या नुकसानीची ही पाहणी करून केळी उत्पादक शेतकरी बालाजी शिरसकर यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्याप्रमाणेच सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडल्याने तांबे वस्ती पाण्यात जाऊन तेथील कुटुंब पाण्यात अडकले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद स्वतः पाण्यात थांबून संबंधित कुटुंबाला बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. तसेच स्थलांतर केलेल्या कुटुंबाला अन्नधान्य पुरवठा करण्याबाबत ही प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेती पिकाचे पंचनामे त्वरित करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी तहसीलदार सचिन मुळीक यांनी मोहोळ तालुक्यातील मोहोळ, नरखेड व सावळेश्वर या तीन मंडळात अतिवृष्टी झाल्याची माहिती दिली. तर तहसीलदार संजय भोसले यांनी माढा तालुक्यातील चार मंडळात अतिवृष्टी झाल्याचे सांगितले. तसेच शेती पीक नुकसानीचे प्राथमिक माहिती घेतली असून त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्यात येईल असे संबंधित तहसीलदार यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी-
करमाळा तालुक्यात रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर आला असून, अनेक गावांमध्ये पूरस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संगोबा येथे सीना नदीच्या बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पाण्याची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोथरे गावचे सरपंच अंकुश शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
करमाळा तालुक्याच्या केम, कोर्टी, जिंती, केतुर, चालसे, पोथरे, उमरड, पांगरी व अर्जुन नगर या 9 महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.