सोलापूर – केंद्र शासनाच्या आदेशानुसार २ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार व मा. अतिरिक्त आयुक्त श्री. रवि पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. या मालिकेतील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून मनपा क्रीडा विभागाच्या वतीने आज, दिनांक १० ऑगस्ट रोजी भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीची सुरुवात हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ. कुर्बान हुसेन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास महापालिका अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅली सुरु करण्यात आले.ही रॅली शहरातील मुख्य मार्गाने जात डफरीन चौकात समारोप करण्यात आले. यामध्ये हरिभाई देवकरण प्रशाला, सिद्धेश्वर प्रशाला, छत्रपती शिवाजी प्रशाला, दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला आणि गांधीनाथा स्कूल या शाळांमधील एकूण २८० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज व जनजागृती फलक घेऊन शहरवासीयांना देशप्रेमाचा संदेश दिला.
यावेळी क्रीडाधिकारी श्रीकांत घोलप, अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू प्याटी, हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा फाटक उपस्थित होते. तसेच क्रीडा शिक्षक मारुती घोडके, प्रसन्न काटकर, शिवानंद सुतार, दादासाहेब म्हमाने, परमेश्वर बेडगे, सुभाष उपासे,संजय पंडित, अंकुशे, माणिक साळसकर, प्रकाश कंपली आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी विद्यार्थ्यांना भारताच्या तिरंगा ध्वजाचे महत्त्व आणि त्यातील रंगांचे प्रतीकात्मक अर्थ यांची माहिती दिली. त्यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान हे फक्त ध्वज फडकवण्यापुरते नसून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्याचे साधन असल्याचे सांगितले.
या रॅलीमुळे शहरातील नागरिकांमध्ये देशाभिमान, ऐक्य व एकात्मतेचा संदेश पोहोचवण्यात यश आले असून, अभियानास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.




