सोलापूर – शहानगर हौसिंग सोसायटी, सोलापूर येथे राहणाऱ्या श्वेता शिवाजी जाधव हिने जिद्दीच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या शासकीय अधिकारी होण्याचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा (MPSC) आयोगातर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2023 या परीक्षेत तिने विमुक्त जाती- अ (VJ-A) प्रवर्गामधून महिलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व तिची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये असिस्टंट एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर (सिव्हिल) वर्ग 1 (Grade-1) या पदासाठी निवड झाली.
दिवसाला 12 ते 14 तास अभ्यास, परीक्षेचा अभ्यास तिने घरी राहून पूर्ण केला. तर तिच्या तिसऱ्या प्रयत्नात तिला यश मिळाले. तिच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट आहेत. वडील शिवाजी जाधव हे उत्तर सोलापूर शहानगर लिमेवाडी येथे दुकानदार असून आई रेखा जाधव यांनी आपल्या खांद्यावर घराचे संपूर्ण ओझे सांभाळत मुलांना शिक्षणासाठी संधी दिली. तिचे आजोबा रामचंद्र जाधव हे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट मध्ये शिपाई म्हणून काम करत होते; तर त्यांच्या अधिकारी होण्याचे स्वप्न श्वेता हिने पूर्ण केले.
तर तिचे प्राथमिक शिक्षण ठोकळ प्रशाला मधून झाले नंतर तिने विजापूर रोडवरील ए. जी. पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग या विभागातून डिप्लोमाचे शिक्षण घेतले, ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या स्थापत्य विभागात शिकत असताना तिला शासकीय अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली; नंतर तिने अभियांत्रिकी शिक्षण 2022 मध्ये पूर्ण केले. शासकीय अधिकारी होण्याची जिद्द व अभ्यासातील सातत्यता या जोरावर तिने हे मोठे यश संपादन केले.