सोलापूर दि:- ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नाना काळे, रा:- सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
या हकीकत अशी की, यातील मयत ओंकार याचे स्वाती हिचे सोबत प्रेम संबंध होते. त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता, त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते.
पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार ही भाड्याने चालवत होता. आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिचे खात्यावर पाठविले होते. त्यावरून दोघात भांडणे झाली होती. त्यामुळे स्वाती ही कोणास ही न सांगता घर सोडून निघून गेली होती. काळजीपोटी मयत ओंकार याने स्वाती ही बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे मिसिंग दाखल केली होती. पोलिसांनी शोध घेतला असता, ती तिच्या बहिणीकडे मिळून आली, त्यानंतर स्वाती ही तिचे आई-वडिलांच्या राहते घरी राहण्यास आली होती. त्यावेळी मयत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिचे आई-वडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिवीगाळ केली होती. त्यानंतर ओंकार हा सतत तणावात असायचा, त्या तणावांमध्ये ओंकार याने एकदा विष देखील पिले होते, दि:-7/10/2023 रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स, निराळे वस्ती रोड येथे नाना काळे, मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली होती. स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर नाना काळे व इतरांनी मयत ओंकार यास स्वाती हिस घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते. तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नाना काळे याची वीस ते पंचवीस पोरे हे येऊन ओंकार यास धमकावत होती. तसेच त्यास फोनवर देखील धमकावत होती. मे -2025 मध्ये मयत ओंकार याने त्याच्या मोबाईल मध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी, तिचे आई वडील व भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते. दि -8/6/2025 रोजी मयत ओंकार हा त्याचा मेव्हणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता, त्याचे सासर्यांनी अपमान करून शिवीगाळ करून लग्नातून हाकलून दिले होते. सततच्या त्रासाला कंटाळून दि:- 8/6/2025 रोजी ओंकार याने आत्महत्या केली. अशा आशयाची फिर्याद मयत ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती.
आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी ॲड मिलिंद थोबडे यांचेमार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात, फिर्यादीचे अवलोकन केले असता, सदरचा गुन्हा हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी 25,000/- रुपयाच्या जातमुचलक्यावर तीन दिवस पोलिस ठाण्यात हजेरी देण्याच्या अटीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.मिलिंद थोबडे, ॲड.राम कदम यांनी काम पाहिले.