येस न्युज मराठी नेटवर्क : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. पोलिसांची गाडी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना घेऊन घटनास्थळावरुन रवाना झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. काँग्रेसकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
याआधी उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी जात असताना पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी चालत निघाले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असं राहुल गांधींनी सांगितलं.