सोलापूर : अर्थसंकल्पातील माहिती सामान्य लोकांना समजावी, अर्थसंकल्पात तरतुदी करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या जातात, अर्थसंकल्पाचे सादरीकरण आणि अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कशी केली जाते, यासह अर्थसंकल्पाविषयीची संपूर्ण माहिती असणाऱ्या “अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही” या प्रा डॉ. संतोष कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. २५) सकाळी १०.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील अॅम्फी थिएटर येथे होत आहे. शिवाजी विद्यापीठातील माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. वसंत जुगळे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होईल. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे हे प्रमुख पाहुणे असतील. तर सोलापूर विभागाचे माजी अतिरिक्त आयकर आयुक्त प्रकाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होईल.
या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य एम. डी. कमळे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप आदी उपस्थित राहतील. या वेळी प्रकाशक प्रा. मंदार फडके विचार व्यक्त करतील. अर्थसंकल्पाविषयी सर्वकाही या पुस्तकावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, निवृत्त प्राचार्य नरेश बदनोरे, अर्थविश्लेषक प्रा. संजय ठिगळे हे भाष्य करतील.
‘अर्थसंकल्पाविषयी सर्व काही…’ या पुस्तकात अर्थसंकल्पाचा इतिहास सांगून देशाचा राज्यकारभार चालवताना अर्थसंकल्पाचे असणारे महत्त्व विशद केले आहे.
अर्थसंकल्पाचा नेमका अर्थ समजून घेता यावा यासाठी विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण केले आहे.
अर्थसंकल्पासंदर्भात भारतीय संविधानामध्ये कोणत्या तरतुदी आहेत, भारतीय अर्थसंकल्पाची रचना कशी असते, अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते त्याचे लेखांकन होईपर्यंत त्याच्या अवस्था कोणत्या असतात, अर्थसंकल्पाची मंजुरी प्रक्रिया कशी असते ? शिवाय अर्थसंकल्प तज्ज्ञांना, अभ्यासकांना व सामान्य जनतेला तो नीट समजून घेता यावा यासाठी शासनाकडून कोणकोणती प्रकाशने प्रकाशित केली जातात, याचीही सविस्तर माहिती या पुस्तकात दिली आहे. शिवाय ‘दृष्टिक्षेपात अर्थसंकल्प २०२३-२४ चे महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्पविषयक प्रकाशन परिशिष्ट स्वरूपात दिले आहे.
अर्थसंकल्पाशी संबंधित संविधानातील तरतुदी, विविध अर्थसंकल्पीय प्रकाशनांचे प्रयोजन, मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची सद्यःस्थिती, राज्याची आर्थिक स्थिती, विविध क्षेत्रांसाठी किंवा समाजघटकांसाठी केलेल्या तरतुदी हे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा फायदा होईल.
केंद्र व राज्य शासनाचा अर्थसंकल्प विचारात घेऊन हे पुस्तक लिहिले आहे. वित्तमंत्र्यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणापलीकडे विद्यापीठस्तरीय व महाविद्यालयीन शिक्षक विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना अर्थसंकल्प व्यवस्थित समजून घ्यायचा आहे अशा सामान्य नागरिकांसाठी, चिकित्सक अभ्यासकांसाठी, सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. सदर प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकाशक मंदार फडके व लेखक प्रा. डॉ. संतोष कदम यांनी केले आहे