सोलापूर – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. गावातील सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा असे आवाहन ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीचे सभागृहात आज दि.1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहिमेचा अभियानाचा शुभारंभ व अभियानाच्या लोगोचे अनावरण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आमदार देवेंद्र कोठे, कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आयुक्त सचिन ओंबासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावा गावात स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणेत आलेल्या आहेत. त्याचा नियमित ग्रामस्थांनी वापर करावा. कायमस्वरूपी गाव स्वच्छ ठेवावे. गावातील कचरा कमी करणे. सेंद्रिय कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
या साठी “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू” हे अभियान आज १ मे पासून सुरु होत आहे. प्रत्येक गावात दिनांक 1 मे 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत या अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. या अभियानात सर्व लोकप्रतिनिधी, गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी सहभागी होऊन आपले गाव स्वच्छ ठेवावे. असे आवाहन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची लोकप्रतिनिधींना साद ..!
राज्यातील खासदार , आमदार व सरपंच यांना लेखी पत्र लिहून “कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. राज्यातील २७ हजार ग्रापमंचायतीचे सरपंच यांना पत्र लिहून भावनिक साद घातली आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी पुढे या. गावात ज्या स्वच्छतेच्या
सुविधा निर्माण केले आहेत त्या वापरात आणा असे आवाहन देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात ४७७१ नॅडेप कंपोस्ट खड्डे- सिईओ कुलदीप जंगम
सोलापूर जिल्ह्यात ४७७१ नॅडेप कंपोस्ट खड्डे आहेत. आज अभियानाची सुरूवात ग्रामविकास मंत्री यांचे हस्ते झाली आहे. तर गावात प्रत्यक्षात कामास सुरूवात करणेत आलेली आहे. गावातील सर्व ओला सेंद्रीय कचरा कंपोस्ट करणार आहोत. या साठी उमेद अभियानातील बचतगटांची नदत घेणेत येणार आहे. स्वच्छ भारत मधून तयार करणेत आलेले ४७७१ नॅडेप भरून घेणेत येणार असल्याचे सिईओ कुलदीप जंगम यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात अभियानास उस्फुर्त प्रतिसाद ..!
सोलापूर जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानात सरपंच , ग्रामसेवक व ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला. येत्या
१५ मे पर्यंत कंपोस्ट खड्डे भरणेची प्रक्रिया सुरू राहणार आहे. गटविकास अधिकारी, बीआरसी सीआरसी , जिल्हा कक्षातील कर्मचारी आज गावपातळीवर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करताना दिसून येत होते.