तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात, पाच-सहा कारखाने सुद्धा झाले आहेत. काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत, अशा व्यापामध्ये गुंतल्याने त्यांचे पक्ष कार्यात कमी लक्ष असल्याची खोचक टीका शिंदे गटाचेच माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली. त्यामुळे एक प्रकारे शिंदे गटातील दोन नेत्यांमध्येच वाद रंगला आहे. गेल्या काही दिवसांपासून तानाजी सावंत हे पक्षावर नाराज असल्या चर्चा आहे. आज (30 एप्रिल) धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे देखील तानाजी सावंत यांनी पाठ फिरवल्याने राजकीय भूवया पुन्हा उंचावल्या. त्यामुळे तानाजी सावंत यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
तानाजी सावंत यांना जे मंत्रिपद मिळाले तेच आश्चर्यकारक
दरम्यान, तानाजी सावंत यांच्या नाराजीवर शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अत्यंत खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. ते म्हणाले की तानाजी सावंत यांना जे मंत्रिपद मिळाले तेच आश्चर्यकारक आहे. तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातील प्रत्येक गोष्टी समजत असतात. तानाजी सावंत यांची एन्ट्री अचानकपणे झाली आणि ते बाजूला पण अगदी अचानकपणे निघून गेल्याची खोचक टिप्पणी शहाजी बापू पाटील यांनी केली. दरम्यान, शहाजी बापू पाटील यांनी यावेळी बोलताना जातनिहाय जनगणनेचं स्वागत केलं. ते म्हणाले की प्रत्येक नेत्याची या संदर्भातील मागणी होती. त्या संदर्भात हा निर्णय झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे अभिनंदन करतो. सामाजिक आणि राजकीय दृष्टीने देशाची प्रगती करणारा हा निर्णय असणार असल्याचे ते म्हणाले.
त्यामुळे शरद पवारांनी शब्द बदलले
यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी शरद पवार यांच्या विधानावर टीका केली. ते म्हणाले की, शरद पवारांनी आधी धर्माचा संबंध नसल्याचे बोलले होते. मात्र, फडणवीस साहेबांनी त्यांना जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी आपले शब्द बदलले आहेत. विजय वडेट्टीवार जे बोलत आहेत ते विनाकारण विरोधाला विरोध करण्याचं काम असल्याचे ते म्हणाले. त्यांनी हल्ल्यातील चित्रीकरण पहावे. या दहशतवाद्यांनी निवांतपणे निष्पाप लोकांना मारले असल्याचे ते म्हणाले. अतिरेक्यांना भीती वाटण्यासारखे तेथे कोणतेही वातावरण नव्हते. गोरगरीब माणसं होती, लहान मुलं होती, महिला होत्या त्यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचे त्यांनी सांगितले.