सोलापूर विद्यापीठात पोट्रेट चित्रण व वक्तृत्व स्पर्धा!
सोलापूर, दि. 16- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा आदर्श घेऊन समाज व देशहितासाठी तरुणांनी काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने पोट्रेट चित्रण व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू प्रा. महानवर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. व्ही. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यासन केंद्राचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले.

कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्थापन होत असलेल्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राकडून संपूर्ण देशभरात विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून एक नावलौकिक प्राप्त करावे. या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा शौर्य गाथा संपूर्ण देशभरातील नव्या पिढीसमोर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पोट्रेट चित्रण स्पर्धेत 72 तर वक्तृत्व स्पर्धेत 42 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, अध्यासन केंद्राचे डॉ. विकास शिंदे, डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. सज्जन पवार, डॉ. बी. जे. लोखंडे, डॉ. अभिजित जगताप, प्रा. धनंजय टाकळीकर आदी उपास्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक कुलसचिव तथा अध्यासन केंद्राचे सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.