श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावनांचा विचार करणार : आयुक्त
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिराच्या विष्णू घाट येथील व लक्ष्मी भाजी मार्केट समोरील प्रवेशद्वाराशेजारील शौचालय हटविण्याची मागणी वीरशैव व्हिजनच्या वतीने तत्कालीन मनपा आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र त्यांची बदली होऊन महानगरपालिका नुतन आयुक्तपदी डॉ. संदीप ओंबासे काल रुजू झाले. त्यामुळे स्मरणपत्र देऊन शौचालय हटाव संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
प्रारंभी नूतन मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांचा वीरशैव व्हिजनच्या वतीने फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, योगेश कापसे, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी, शिवानंद येरटे उपस्थित होते.
यावेळी आयुक्तांना श्री सिद्धेश्वर मंदिराचे विष्णु घाट येथे लक्ष्मी भाजी मार्केटसमोर प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या शेजारी सुलभ शौचालय आहे. तसेच तिथे कचरा टाकला जातो, प्रचंड घाणीचे साम्राज्य असते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. मोकाट जनावरे येतात. मलमूत्र विसर्जन करतात. त्यामुळे मंदिराचे तलावाचे सौन्दर्य आणि पावित्र्य धोक्यात आले आहे. या बाबी निदर्शनास आणून दिल्या.
जगात कुठल्याही मंदिराच्या व प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वाराशेजारी शौचालय नाही. श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर शौचालय असणे अयोग्य आहे. ती सोलापूरकरांसाठी शरमेची बाब आहे त्यामुळे ते शौचालय त्वरीत हटविण्यात यावे. तो परिसर स्वच्छ ठेवण्यात यावा. त्यामुळे मंदिराचे, तलावाचे पावित्र्य व सौंदर्य अबाधित राहील. महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
शेवटी आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले की श्री सिद्धेश्वर भक्तांच्या भावनांचा विचार केला जाईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.
सिद्धेश्वर मंदिरासमोरील शौचालय हटवण्याची मागणीचे स्मरणपत्र नुतन मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना देताना राजशेखर बुरकुले, राजेश नीला, योगेश कापसे, अमित कलशेट्टी, सोमनाथ चौधरी