- पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा 20 वा दीक्षांत समारंभ उत्साही वातावरणात संपन्न…
- 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान, 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित
सोलापूर : सोलापूर हा बहुविध, बहुभाषिक असा महत्वपूर्ण जिल्हा आहे. येथील कापड उद्योग क्षेत्र खूप मोठे असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने पुढील काळात कापड उद्योग क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारे अभ्यासक्रम विकसित करावेत, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या 20 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल राधाकृष्णन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी, कुलगुरू प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, परीक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत अंधारे यांच्यासह अन्य मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन पुढे म्हणाले की, सोलापूर हे कापड उद्योगाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. तसेच येथे दळणवळणाचे सर्व साधने उपलब्ध आहेत. लवकरच हवाई वाहतुकीने हे सोलापूर जोडले जात आहे, त्यामुळे कापड उद्योगाला चालना मिळेल या प्रकारचे अभ्यासक्रम विद्यापीठाने निर्माण करून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. यामध्ये फॅशन डिझायनिंग, बी टेक, बीएससी टेक्स्टाईल, केमिकल आदी अभ्यासक्रमाच्या समावेश करावा. तसेच विद्यापीठाने येथील बाजारपेठ समजून घेऊन व्यापारी उद्योजक यांच्या समन्वयातून बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे अभ्यासक्रम निर्माण करावेत असे त्यांनी सांगितले.
केंद्रशासनाने सन 2047 पर्यंत भारत एक विकसन विकसित राष्ट्र होईल असे उद्दिष्ट समोर ठेवले असून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल हेही उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट चांगल्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून साध्य होणार आहे. विद्यार्थ्यांनी समर्पण भाव ठेवून शिक्षण घेऊन संशोधनात्मक वृत्ती जागृत ठेवली पाहिजे. भारतातील शास्त्रज्ञही जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञाच्या बरोबरीचे आहेत याचे उदाहरण म्हणजे कोविड वरील पहिली लस भारतीय शास्त्रज्ञाने निर्माण केली तसेच भारताची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील चांद्रयान मोहीम ही भारतीय शास्त्रज्ञाचे महत्त्व अधोरेखित करते. तसेच मानवी विकासाचा निर्देशांक ही शिक्षणाच्या माध्यमातून ठरणार आहे. शिक्षण हे जीवनभर घेत राहिले पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कठोर शिस्तीचे पालन करावे व नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले.
विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जाते. विद्यापीठातून नवीन ज्ञान मिळवून ज्ञानाचा प्रसार करण्याचे कामही विद्यार्थ्यामार्फत केले जाते. विद्यार्थ्यांनी नेहमी आनंदी राहिले पाहिजे तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संशोधनाच्या कामात स्वतःला ठेवले पाहिजे. विद्यार्थ्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ होईल यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच राष्ट्राचे उत्पन्न वाढून एक सामर्थ्यशाली राष्ट्र घडण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांनी केले.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. यामध्ये विद्यापीठ अंतर्गत विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, आंतरविद्या शाखा, मानव विज्ञान शाखा, विज्ञान व तंत्रज्ञान या शाखांचा अभ्यासक्रमाबरोबरच विविध विद्यापीठ स्तरावरील क्रीडा प्रकारांची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या वतीने वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले. विद्यापीठ कौशल्य शिक्षणावर भर देत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर फॉर रिसर्च सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट यासाठी 155 कोटीचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाला काही दिवसापूर्वीच शंभर कोटीचा निधी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगून विविध पायाभूत सुविधा निर्मिती बरोबरच शैक्षणिक कार्यात हा निधी वापरला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमासाठी देशाचे माननीय प्रधानमंत्री महोदय यांना आमंत्रित करण्याची मागणी त्यांनी यावेळी राज्यपाल महोदय यांच्याकडे केली.
यावेळी विद्यापीठ परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील चित्रांचे प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांनी करून अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन प्रवास हा आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी राज्यपाल महोदय व अन्य मान्यवर यांचे व्यासपीठावर आगमन दीक्षांत मिरवणूकीतून झाले. त्यानंतर राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये विद्यापीठाच्या विविध ज्ञान शाखेमधील 15 हजार 291 विद्यार्थ्यांना पदवी तर 71 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. हा दीक्षांत समारंभ कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.