सोलापूर – डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी डिफेक्स 2025 या राज्यस्तरीय प्रदर्शन आणि कार्यरत मॉडेल्सच्या स्पर्धेचे आयोजन दि. 3 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत पुण्यातील सीओईपी मैदानावर करण्यात आले असून या स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र- कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्जन सृजन आणि सृजन ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेचा मुख्य उद्देश तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थी विविध तांत्रिक मॉडेल्ससह सहभागी होणार आहेत. 300 हून अधिक कार्यरत मॉडेल्स आणि 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होतील. कृषी तंत्रज्ञान, संगणकीय बुद्धिमत्ता, औद्योगिक ऑटोमेशन, वैद्यकीय व आरोग्य सेवा तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, आणि नवनवीनता अशा विविध तांत्रिक विषयांचा समावेश आहे. यात स्टार्टअप, इनक्युबेशन आणि बौद्धिक संपदा हक्कांचे मार्गदर्शन केले जाते. यासाठी उद्योगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे, संशोधक, उद्योजक, आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी शोध, सर्वोत्तम उद्योग प्रायोजित प्रकल्प, महिला आणि तांत्रिक नवकल्पना पुरस्कार मिळणार आहेत.
यासाठी विद्यार्थ्यांना 15 जानेवारी 2025 पर्यंत srijan.org.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. पोस्टर प्रकाशनाचा कार्यक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, डॉ. अनिल घनवट यांच्या हस्ते या पोस्टरचे प्रकाशन झाले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तसेच सोलापूर विभाग संयोजक ओम इंगळे, महानगर मंत्री यश उडानशु, महानगर सहमंत्री श्रेयस सगम, नगर मंत्री शिवरत्न पवार आदी उपस्थित होते.