सोलापूर, दि. 29- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात दि.1 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा‘ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठांमध्ये तसेच संलग्नित महाविद्यालयांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र- कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा आणि उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. नलिनी टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुस्तकांचे सामूहिक वाचन, ग्रंथ प्रदर्शन इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत.या उपक्रमापूर्वी सर्व ग्रंथालयांमध्ये स्वच्छता मोहीमही राबवण्यात येणार आहे
विद्यापीठाच्या डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामार्फत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आधारित पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने गौरविण्यात येणार आहे. सहभागासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकाचे परीक्षण तसेच पुस्तकासोबत चा फोटो https://forms.gle/PVCbdJcb9M9xn3Wj7 या लिंकवर अपलोड करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 26 जानेवारी रोजी विद्यापीठात होणार आहे. या स्पर्धेमध्ये विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, अशी माहिती ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रकांत गार्डी यांनी दिली. स्पर्धेबाबत अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ.पल्लवी सावंत (8180975488) यांचेशी संपर्क साधावा.