सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सभेत पावणेचार कोटींच्या विविध विकास कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.सभा प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास यंत्रणेच्या सभागृहात झाली.
सभेच्या विषय पटलावर सात विषय होते. बांधकाम विभाग क्रमांक एककडील रस्ते, केगाव रस्ता सुधारणा करणे या १ कोटी १३ लाख २० हजार रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील नारी ते भातंबरे रस्ता, मालवडी ते कापसेवाडी, कुसळंब ते वानेवाडी, पिंपळगाव धस ते चिपडे वस्ती, आगळगाव ते थिटे वस्ती जोड रस्ता सुधारणा करण्याच्या ७७ लाख ८५ हजाराच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ते बनजगोळ- हत्तीकणबस रस्ता सुधारणा करण्याच्या ८५ लाख १ हजार ७२४ रुपये किमतीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. हल्लूर येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याच्या ९० लाख ५६ हजार ५०९ रुपयाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील तडवळ, दहिटणे, राळेरास धामणगाव, दहीटणे, सासुरे या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या ९७ लाखाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. या सभेत ३ कोटी ७३ लाख २४ हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर चर्चा करण्यात आली. सभेचे सचिव तथा प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी विषयांचे वाचन केले.