जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील अत्यंत गजबजलेल्या लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात किमान 15 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लाल चौकात घबराट पसरली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाने घेराबंदी केली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी लाल चौकातील ऑल इंडिया रेडिओ स्टेशनबाहेर सीआरपीएफच्या बंकरवर हा ग्रेनेड हल्ला केला आहे. माहिती मिळताच, जम्मू-काश्मीर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने स्फोट झालेला संपूर्ण परिसर सील केला आहे.
दहशतवाद्यांसोबत चकमक
दरम्यान, श्रीनगरच्या खन्यारमध्ये काल म्हणजेच शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर कमांडर उस्मानला ठार केले होते. उस्मान हा लष्कर कमांडर सज्जाद गुलचा उजवा हात मानला जातो. उस्मानचे सांकेतिक नाव ‘छोटा वलीद’ असे होते.