सोलापूर- प्रिसिजन कॅमशाफ्टस लिमिटेडच्या सीएसआर निधीतून छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे देण्यात आलेल्या हिमो डायलिसिस युनिटचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिव्हील हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर तर प्रमुख उपस्थिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा व डॉ विठ्ठल धडके इ मान्यवर उपस्थित होते.
प्रिसिजनच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे एक डायलिसिस युनिट देण्यात आले. या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ सुहासिनी शहा बोलताना म्हणाल्या कि, प्रिसिजन सीएसआर निधीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवित आहे, शैक्षणिक, आरोग्य आणि शाश्वत विकास यासाठी प्रिसिजन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही प्रिसिजनच्या माध्यमातून सिव्हिल हॉस्पिटल येथे १२ डायलिसिस युनिटचा अत्याधुनिक वॉर्ड व सुसज्ज ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स व दोन हिमो डायलिसिस युनिट तसेच जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मशीन प्रिसिजनच्या माध्यमातून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ संजीव ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सिव्हील हॉस्पिटल सामान्य लोंकाना चांगल्या आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे.कोविड काळात सिव्हील हॉस्पिटलचे कार्य कौतुकास्पद राहिलेले आहे असे त्यांनी सांगितले. प्रिसिजनने जुलै २०१८ साली दिलेल्या हिमो डायलिसिस युनिटमुळे आजपर्यंत १६२२९ रुग्णांना या डायलिसिसची सेवा मोफत देण्यात आली असे ही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रिसिजनच्या सीएसआर निधीतून देण्यात आलेल्या डायलिसिस मशीनचा सामान्य रुग्णांना उपयोग होईल. प्रिसिजननी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमावेळी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,नर्स व कर्मचारी उपस्थित होते.