येस न्युज नेटवर्क : राज्यातील सर्वाधिक धरणं असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचं समजलं जाणाऱ्या भंडारदरा धरणाचं सरकारनं नाव बदललं आहे. अकोले तालुम्यात असणारं हे फेमस ब्रिटिशकालीन धरण समजले जाणारे भंडारदरा धरणाचे आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आले आहे. याबाबत सरकारनं नुकताच अद्यादेश जारी केलाय. महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणारे भंडारदरा धरण आणि तिथेच असणारा रंधा धबधबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्यास मान्यता दिल्यानंतर आता धरणांचीही नावं बदलू लागल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जलसंपदा विभागाच्या अख्त्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात आले आहे.
कोण आहेत वीर राघोजी भांगरे?
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा धरणांसह क्रांतीकारकांचा तालुका समजला जातो. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अकोले तालुक्यातील देवगाव येथील राघोजी भांगरे यांनी संघर्षमय लढा उभारला होता. यातच त्यांचे बलिदान दिले होते. त्यामुळे या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय, असे नामकरण देण्यात यावे, अशी आग्रही भूमिका माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली होती. भंडारदरा गाव हे महादेव कोळी आदिवासी समाजबांधवाची अधिक संख्या असणारं गाव आहे. २०२१ पासून या नामकरणासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी भंडारदरा धरणावर आंदोलन उभारण्यात आले होते.