सोलापूर : जनकल्याण मल्टीस्टेट,सोलापूर या पतसंस्थेला सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट द्वारे केंद्रीय निबंधक न्यु दिल्ली यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्कार सोहळयात होणार आहे.
राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट ही संस्था भारतातील सहकार क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांचे शासकीय धोरण ठरवणे व सहकार क्षेत्रात काम करत असताना येणा-या अडचणी राष्ट्रीय स्तरावर मांडण्याचे काम करते. राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे विद्यमान अध्यक्ष सुरेश वाबळे तर उपाध्यक्ष अंकलकोटे पाटील हे काम पाहतात. राष्ट्रीय फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटच्या वतीने सहकार चळवळीमध्ये आपले योगदान देणारे व शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करून कार्य करणा-या संस्थांचे मूल्यमापन करून संस्थांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते. सन २०२२ ते २३ या आर्थिक वर्षामध्ये १२६ ते २०० कोटी ठेवी या गटामधून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार हा जनकल्याण मल्टीस्टेट, सोलापूर संस्थेस जाहीर झालेला आहे. पुरस्काराचे वितरण दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे आयोजित केलेल्या सहकार परिषदेमध्ये केंद्रीय निबंधक आनंद कुमार झा यांच्या शुभहस्ते व फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे . संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी सदरील पुरस्कार प्राप्त झाल्याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी, ठेवीदार, कर्जदार, सभासद व हितचिंतक यांना दिले आहे . संस्थेस मिळालेल्या पुरस्काराबददल समाजाच्या सर्व स्तरांमधुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .