मुंबई : तानाजी सावंत आरोग्यमंत्री आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरांना दाखवून द्यावे आणि उलटीच्या गोळ्या घ्याव्या, त्यांच्याकडे नसेल तर मी पाठवून देतो, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी खोचक टोला लगावला आहे. तर शेतकऱ्यांची अवकात काढणे एवढे सोपे काम नाही, मंत्री जर अशा पद्धतीने धाडस करत असेल तर शेतकरी त्यांना त्यांची अवकात दाखवेल, असेही कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान बच्चू कडू पुढे बोलताना म्हणाले की, दानवेंनी शेतकऱ्यांना साले म्हटले होते, त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत पाडले, त्याच प्रकारे तानाजी सावंत यांना सुद्धा त्या परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशारा कडू यांनी दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, पाठिंबा कुणाला द्यायचा आणि कुणाला नाही हे आम्ही आणि जनता ठरवणार, शिरसाट नाही. आज आमचे दोन आमदार आहे, उद्या आमच्याशिवाय सरकार बसणार नाही, त्यावेळी आम्ही अन् शेतकरी बांधव आमच्या मुद्द्याशिवाय कोणासोबत जाणार नाही. रवी राणा यांच्याविरोधात आम्ही आधीच कोर्टात गेलो आहोत त्यांना नोटीससुद्धा गेली असेल. आग लागल्यावर धूर निघत असतो, त्या धुराकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांना पडण्याचं दुःख आहे. आमचा हिशोब जनता घेईल, त्यांच्या हाती काय आहे? जे स्वतः पडले ते दुसऱ्याला पाडण्याची काय भूमिका बजावणार आहे? राजकुमार पटेल व माझ्या विरोधात कोणीही उमेदवार दिला तरी मतदारसंघातील लोक ठरवतील, मत लोक मारतात.आमचा सगळा हिशोब घेण्याचं काम जनता करते, तुम्ही आम्ही नेते घेणारे कोण? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.