पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन सोलापूर विज्ञान केंद्रात उत्साहात
विद्यार्थ्याचे अंतराळ संशोधनावर नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण
सेल्फी विथ चांद्रयान-३ मोहिमेचा विज्ञानप्रेमींनी घेतला आनंद
चंद्राला स्पर्श म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास
सोलापूर, दि. २३ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचा प्रवास हा बैलगाडी, सायकल पासून सुरू झाला आणि २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारताने चंद्रयान-३ तीन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आणि प्रज्ञान रोव्हरने पृथ्वीवर छायाचित्र पाठवले, हा प्रवास अतिशय थक्क करणारा आणि अंतराळ संशोधक व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी केले.
पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित केंद्रीय संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि सोलापूर विज्ञान केंद्र यांच्या सयुंक्त विद्यमाने सोलापूर विज्ञान केंद्रातील बहुउदेशीय सभागृहामध्ये आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी कुलगुरू महानवर बोलत होते.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहसंचालक नलिनी टेंभेकर, उपायुक्त तैमूर मुलाणी, आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, विज्ञान केंद्राचे राहुल दास एम, नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे सदस्य सचिव बिनय प्रसाद साव आणि सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू महानवर म्हणाले भारतीय शास्त्रज्ञांना चांद्रयान-२ मोहिमेचे सॉफ्ट लँन्डींग करताना अपयश आले तरी शास्त्रज्ञांनी जिद्दीने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी केली. त्यामुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा, टेलिफोनची 5जी पर्यंतची क्रांती तसेच एआय मुळे होणारे संशोधन हे अंतराळ संशोधनामुळे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आज अंतराळ संशोधन करत असताना पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करणे देखील महत्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.
सहसंचालक टेंभेकर म्हणाल्या, विज्ञान हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जाणारे एक मोठे साधन आहे. यादृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यानी नेहमी सतत संशोधन करत राहावे. चांद्रयान-३ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण आणि अंतराळ संशोधनामध्ये भारतानी केलेली प्रगती विषयी प्रदर्शनात मांडण्यात आलेली माहिती विद्यार्थ्यांना उर्जा आणि नवसंशोधकाना प्रेरणादायी आहे.
अंतराळ क्षेत्रात होत असलेल्या संशोधनामुळे आज मानवी जीवन सुसाह्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात नेहमी संशोधन दृष्टीकोन ठेवावा, असे मत प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पहिल्या अंतराळ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोलापूर विज्ञान केंद्रात सुरु असलेल्या विविध उपक्रमांची आणि इस्रोच्या स्थापनेपासून ते चांद्रयान-३ मोहिमे पर्यंतच्या प्रवासाची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून राहुल दास यांनी दिली.
चांद्रयान-३ मोहीम, आपल्या अंतराळ संशोधन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा, मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय अभिमानाने स्वीकारण्यात आला. विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले, त्याला ‘शिवशक्ती’ पॉइंट (सतीओ शिव शक्ती) म्हणून ओळखले जाते, हा आपल्या सर्वासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लैंडिंग करणारे भारत चौथे राष्ट्र बनल्यानंतर आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. या घटनेच्या स्मरणार्थ, २३ ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या वर्षी भारत आपला पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस ‘चंद्राला स्पर्श करताना जीवनाला स्पर्श करणे: भारताची अंतराळ गाथा’ या संकल्पनासह अभिमानाने साजरा केला जात असल्याचे अंकुश चव्हाण यांनी प्रास्ताविकेतून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास यादव यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामध्ये २५ शाळेतील विद्यार्थ्यांनी अंतराळ संशोधनावर विविध नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये चांद्रयान-३ मोहिमेचे मॉडेल, जलविद्युतनिर्मितीचे प्रकल्प, रॉकेट सायन्स, आर्यभट्ट उपगृह यासारख्या अनेक विषयांवर प्रकल्प सादर करण्यात आले आहेत.
सदर प्रदर्शनामध्ये चांद्रयान-३ मोहिमेची निर्मिती, प्रक्षेपण, चंद्रावर उतरलेले विक्रम लँडर आणि रोव्हर प्रज्ञान, अंतराळ तंत्रज्ञान यांचे दुर्मिळ फोटो, मा. पंतप्रधान यांचे भाषण, संपूर्ण मोहिमेचे ऑडीओ व व्हिडीओ आणि सेल्फी विथ चांद्रयान -३ मोहीम इत्यादी माहिती असणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते ५.३० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, विज्ञान केंद्राचे श्रीकांत बिदरे, ज्योती दास, व्यंकट देशमुख, औदुंबर गायकवाड, बाळासाहेब राठोड, भाग्यश्री मंडवळकर, सोनाली भोसले, राजेंद्र चिटटे, विठ्ठल गायकवाड, अर्चना भोसले, साईराज राऊळ, सुरज जाधव आदींनी परिश्रम घेतले.