मोडनिंब : प्रकाश सुरवसे : कांदा, मुळा, भाजी….अवघी विठाई माझी… लसूण, मिरची कोथिंबिरी, ….अवघा झाला माझा हरी…. असे म्हणणारे श्री संत शिरोमणी सावता महाराज हे विठुरायाचे निस्सिम भक्त होते. म्हणूनच दरवर्षी आषाढी यात्रेनंतर विठुरायाची पालखी निस्सिम भक्त असणाऱ्या सावता महाराजांना भेटावयास येत असते. रोपळे आणि आष्टी या दोन मुक्कामानंतर आज सायंकाळी विठुरायाची पालखी मोठ्या भक्तीमय वातावरणात अरण मध्ये पोहोचली. सावतोबांच्या भेटीला विठुरायाची पालखी आल्यामुळे अरण हा भक्तीचा मळा भाविकांनी फुलून गेला आहे.
संत शिरोमणी सावता महाराज यांचा ७२९ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात अरणध्ये साजरा होत आहे. हरिनाम सप्ताहाने यात्रेची सुरुवात झाली आहे. या विशेष सोहळ्यास विठुरायाची पालखी अरण मुक्कामी असते. यावर्षी पालखीचा मुक्काम पाच दिवस अरण मध्ये असणार आहे अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विजय कुलकर्णी यांनी दिली.आरणच्या हद्दीत पालखी आल्यानंतर उत्तमराव सावंत पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीने विठुरायाच्या पादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. पालखी येणार म्हणताच काही ग्रामस्थ सुमारे तीन तास अगोदरपासून स्वागताची तयारी करत होते.
रोपळे आणि आष्टी या मुक्कामाच्या ठिकाणी तसेच मोडनिंब परिसरातील पालखी मार्गावर गिड्डेवाडी, मोडनिंब येथील ‘गोल’ या ठिकाणी विठुरायाच्या पालखीसमोर कीर्तन, भारुड, गवळण हे कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मोठ्या भक्ती भावाने परिसरातील भाविकांनी कीर्तन, भारुड, गवळण ऐकण्याचा लाभ घेतला. मोडनिंब येथे विविध संस्था संघटनांच्या वतीने तसेच विविध कुटुंबांच्या वतीने विठुरायाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मोडनिंब रोटरी क्लब च्या वतीने दरवर्षी भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा म्हणून औषधे वाटप करण्यात येतात. याही वर्षी विशेष नियोजन करून रोटरी क्लबच्या वतीने मोफत औषधे वाटप करण्यात आली अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष संतोष दळवी आणि सचिव सुनील यांनी दिली.
संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट, संत सावता महाराज अन्नछत्र मंडळ, संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, ग्रामपंचायत अरण जिल्हा परिषदेचे भारत शिंदे, समाज कल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, विठ्ठल गाजरे, एडवोकेट विजय शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. बबन वाघमारे यांच्या कुटुंबाच्या वतीने विठुरायाच्या पालखी पालखी समोर रांगोळ्या काढून पायघड्या अंथरूण स्वागत केले. वाघमारे कुटुंबातील सावता वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, निरंजन वाघमारे या सदस्यांनी यावेळी परिश्रम घेतले. तोफांची सलामी देत फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या भक्ती भावाने विठुरायाची पालखी अरणमध्ये आणण्यात आली.