सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराने राम रेड्डी सन्मानित!
सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा!
सोलापूर, दि.1- संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली. गेल्या वीस वर्षात या विद्यापीठाने चांगली भरारी घेतली आहे, आता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून नवनवीन कोर्सेस सुरू करून एक रोल मॉडेल युनिव्हर्सिटी म्हणून देशभरात या विद्यापीठाचा नावलौकिक व्हावा, अशा सदिच्छा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन गुरुवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. सकाळी आठ वाजता कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाचा मानाचा व प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री राम रेड्डी यांना प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव योगिनी घारे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रभारी वित्त व लेखाधिकारी प्रा. विकास घुटे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचे वाचन केले.
कुलगुरू प्रा. फुलारी म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चांगल्या गोष्टींचा समाविष्ट झाल्याने विद्यार्थ्यांना कौशल्याभिमुख तसेच आंतरविद्याशाखीय पद्धतीने शिक्षण घेण्याची संधी आहे. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील कृषी आणि उद्योगावर आधारित काही नवीन कोर्सेस सुरू करावेत. जेणेकरून येथील विद्यार्थ्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम शिकता येईल. त्याचबरोबर फॉरेन लॅंग्वेज डिपार्टमेंट देखील या विद्यापीठाने सुरू करावा, जेणेकरून यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यास व प्रगती करण्यास मदत होईल. पंतप्रधान उच्चस्तर शिक्षा अभियानातून शंभर कोटी अनुदान या विद्यापीठास प्राप्त झाल्याने चांगल्या पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. त्यामुळे विद्यापीठाचा विकास होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
श्री राम रेड्डी म्हणाले की, शिक्षणतज्ञांनी निवड करून दिलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार हा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ज्ञानाच्या सरस्वतीकडून हा पुरस्कार प्राप्त झाल्याने जीवन कृतार्थ झाले आहे. आमची बालाजी अमाईन्स ही भारतीय तंत्रज्ञानावर आधारित तयार झालेली कंपनी असून देशाच्या उद्योग, व्यवसायात आपल्यापरीने योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. सोलापूर व परिसरातील तरुणांना यामुळे रोजगार मिळाले. त्यांच्यामुळेच आज कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू असून हा पुरस्कार त्यांच्यामुळेच मिळाला, याचा आनंद आहे.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून आज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी फायदा होणार आहे. जागतिक पातळीवर विद्यापीठाचे नावलौकिक होण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय वारकरी भवन, दिव्यांग सेंटर, सेंटर फॉर ट्रान्सजेंडर आदींचा समावेश आहे. यासाठी सध्या विद्यापीठाकडून प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. पदवी व पदव्युत्तर विविध अभ्यासक्रम देखील विद्यापीठाकडून सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले.
या कार्यक्रमात 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कर्नल विक्रम जाधव आणि एस. एम. अरुणकुमार ठाकूर, सुलतान पठाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे, ममता बोल्ली, श्रुती देवळे यांनी केले तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक श्री राम रेड्डी यांना प्रदान करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे कुलगुरू प्रा. विजय फुलारी, कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे आदी.
चौकट
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
1) उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर, ता. सांगोला.
2) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर, ता. मोहोळ
3) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. चंद्रकांत श्रीपती सूर्यवंशी, बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर.
4) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ):
डॉ. बाळकृष्ण जगन्नाथ लोखंडे, संचालक, पदार्थविज्ञान संकुल
डॉ. गौतम सुभाना कांबळे, संचालक, सामाजिकशास्त्रे संकुल
5) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय):
डॉ. वीरभद्र चनबस दंडे , डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
डॉ. आयेशा रंगरेज, कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
6)उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): श्री आनंदराव बहिरू पवार, सहाय्यक कुलसचिव
7)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग तीन विद्यापीठ): रूपाली विजयकुमार हुंडेकरी, वरिष्ठ लिपिक
8)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वर्ग चार विद्यापीठ): श्री नामदेव यशवंत सोनकांबळे, वाहनचालक
9)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (लिपिक संवर्गीय महाविद्यालय): श्री कैलास भागवत सातव, मुख्य लिपिक भारत महाविद्यालय, जेऊर
10)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): श्री अभिजीत बाळासाहेब जाधव, ग्रंथालय परिचर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर