शिक्षकांसाठी अभ्यास नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशन आयोजित अभ्यास नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आज मॉडर्न प्राथमिक शाळेत उद्धघाटन झाले. अभ्यासनाट्य विषयाचे प्रशिक्षक प्रकाश पारखी, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, मॉडर्न शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा बोधे, संस्थेच्या विस्वस्त शिल्पा जोशी व सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळे यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविक करताना डॉ सुहासिनी शहा म्हणाल्या की, प्रिसिजन फाउंडेशनने आजवर अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण विषयात पासवर्ड अभियान, ई-लार्निंग प्रकल्प, बैठक @ स्कुल यांसारखे प्रकल्प सुरु आहेत. याबरोबरच मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, नाट्य कलेमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा व मुलांना अभ्यासामध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने अभ्यास नाट्य ह्या नवीन प्रकल्पाची सुरवात करण्यात येत आहे.
ह्या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातील पाठांवर नाटकाची संहिता बनवून त्यावर नाटक बसवून त्यातून मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमाची नाट्य संहिता बनविणे, नाटक बसविणे व मुलांना ते शिकविणे यासंदर्भात शहर व जिल्हातील शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा सलग तीन दिवस असणार आहे. पहिल्या दिवशी ०९ शाळांमधील ५५ शिक्षक, दुसऱ्या दिवशी शेटफळ येथे ६ शाळांमधून २० शिक्षक तर तिसऱ्या दिवशी सेवासदन हायस्कुल येथे ८ शाळांमधील ५५ शिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत.
अभ्यास नाट्य कशासाठी ?
व्यक्तिमत्व विकासासाठी नाट्य प्रशिक्षण आवश्यक आहे. मागील अभ्यासक्रमात आणि नवीन अभ्यासक्रमातही त्याचा समावेश आहे. सर्व कलांचे एकत्रीकरण नाटकामध्ये असते. सर्व कलांचे प्रशिक्षण वर्ग आहेत, त्यांच्या परीक्षाही आहेत, पण सर्व कला समावेशक नाटक मात्र दुर्लक्षित आहे. अभ्यासनाट्य या संकल्पनेमुळे अभ्यास तर सोपा होतोच, मनोरंजकही होतो आणि सादरीकरणामुळे सादर करणाऱ्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास, पाहणाऱ्या मुलांचा अभ्यास, आणि एक समजदार प्रेक्षक तयार होतो. ज्याला समीक्षणाची सवय लागते. सर्वच कला व्यक्त होण्यासाठी असतात पण नाटकांमुळे मुले जास्त व्यक्त होतात अभ्यास नाट्य ही काळाची गरज आहे.