मनस्वी करिअर अकॅडमी, वडाळा येथे दि. ०७ जुलै २०२४ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. बळीराम (काका) साठे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर), प्रमुख अतिथी सन्मा. शरदकृष्ण ठाकरे (मॅनेजिंग डायरेक्टर, एल.एच.पी., सोलापूर), सन्मा. प्रल्हाद (मामा) काशीद (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर व आदर्श उद्योजक) यांनी उपस्थित राहून मनस्वी करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर उद्बोधन करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची एक वेगळीच ताकद असते, त्याचबरोबर ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्काराचे धडे सुद्धा पावलोपावली आपल्या ग्रामीण समाजातून मिळत असतात. यातूनच आपण आपले व्यक्तिमत्व विकसित करून यशाला गवसणी घालायची असते असे मौलिक उद्गार सन्मा. शरदकृष्ण ठाकरे यांनी काढले. यावेळी विद्यार्थ्यांना बोलत असताना आपली स्वतःची जडणघडण कशी झाली हे सांगताना मी सुद्धा ग्रामीण भागातील एक तरुण, माझ्या उच्च शिक्षणानंतर व्यवसायाकडे कसा वळलो आणि आज माझ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स जगभरामध्ये वापरले जातात आणि आज माझी कंपनी वार्षिक 500 कोटी पेक्षा जास्त उत्पादनांची विक्री करते. हे सार शक्य झालं त्याचा एकच गुरु मंत्र म्हणजे प्रामाणिकपणा, सातत्यपूर्ण कष्ट आणि वेळेचे महत्व खूप काटेकोरपणे पाळले असे प्रतिपादन सन्माननीय शरद कृष्ण ठाकरे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मा. बळीराम काका साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांनी आपले उच्च ध्येय ठेवून यशाला गवसणी घालत असताना एक अपयश आले तरी खचून जायचं नसतं. परत नव्या उमेदीने, नव्या जोमाने, आणि नव्या धाडसाने प्रयत्न करायचे असतात. प्रामाणिक आणि सचोटीच्या प्रयत्नांमध्ये यश लपलेला असतं ते आपल्याला शोधून काढता आले पाहिजे आणि यशस्वी झाल्यानंतर देखील आपण आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या स्वकर्तृत्वातून लौकिक मिळवला पाहिजे असे प्रतिपादन सन्मा. बळीराम (काका) साठे यांनी केले. पुढे तरुणाईच्या बद्दल बोलत असताना विद्यार्थ्यांनी नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये आपण अपयशी ठरलो तरी हरकत नाही पण आपण समाजउपयोगी आदर्श तरुण म्हणून जरी आपला लौकिक मिळवला हे देखील फार मोठे यश आहे असे सन्मा. काकासाहेबांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करत असताना महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला आणि खेडी समृद्धी करा असा सल्ला आपणा सर्वांना दिला आहे. पण खऱ्या अर्थाने खेडी त्याच वेळी समृद्ध होतील जेव्हा या खेड्यातील तरुण उच्चशिक्षित होऊन नोकरी आणि व्यवसायामध्ये येईल. त्यामुळे आजच्या तरुणाईने जोमाने कष्ट करा आणि आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा असे मार्गदर्शनपर शुभाशीर्वाद सन्मा. प्रल्हाद (मामा) काशीद यांनी दिले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये मनस्वी करिअर अकॅडमीच्या परिसरामध्ये एकूण 150 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षलागवडीसाठी सन्मा. प्रल्हाद (मामा) काशीद (आदर्श उद्योजक), सन्मा. आनंदा तोडकरी (आदर्श शेतकरी), सन्मा. अमोल सरवळे (माजी उपसरपंच, मोरवंची), सन्मा. जितेंद्र भोसले (माजी उपसरपंच, पडसाळी), सन्मा. धनाजी भोसले, सन्मा. सचिन भोसले, सन्मा. नाना सिरसट यांनी वृक्ष देणगी स्वरूपात दिले व या सर्व वृक्षांचे पालकत्व मनस्वी करिअर अकॅडमी, वडाळा यांनी स्वीकारले याचवेळी या वृक्षदात्यांचा सन्मान देखील करण्यात आला.
या वृक्ष लागवड व मार्गदर्शनपर कार्यक्रमावेळी सन्मा. मनोज (आण्णा)साठे (ग्रा. पं. सदस्य, वडाळा), सन्मा. डुरे-पाटील साहेब, सन्मा. समाधान रोकडे (सरपंच, पडसाळी), सन्मा. नागनाथ पवार, सन्मा. रमेश साठे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर सिरसट यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण भाले यांनी मानले.