सोलापूर, दि. 28:- जिल्ह्यातील एकटे राहणारे वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक व निराधर व्यक्ती यांना हेल्पलाइन व भ्रमणध्वनी क्रमांकाच्या माध्यमातून 111 ज्येष्ठ नागरिकांना घरपोच वैद्यकीय सेवा व जीवनाश्यक वस्तू पोहोच करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्षाद्वारे ही मदत करण्यात आली. सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांच्या नेतृत्वाखालील कक्षाने ही कामगिरी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन कालावधीत एकटे राहणारे, निराधार, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्ती यांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्याकरिता श्री. आढे यांची नोडल अधिकारी म्हणून तर सच्चिदानंद बांगर यांची सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांना शहर व तालुकानिहाय मदत करण्याकरिता एकूण 93 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी 0217-2734950 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना घरपोच मदत करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तू तसेच वैद्यकीय सेवा घरपोच पुरविण्यात येत आहे. 2 एप्रिल ते 27 मे या कालावधीत एकूण 111 जेष्ठ नागरिकांना मदत करण्यात आल्याचे श्री. आढे यांनी सांगितले.
हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधितांना जीवनावश्यक वस्तू जिल्हा प्रशासनामार्फत घरपोच करण्यात येणार आहे. त्यामुळे एकटे राहणारे, वयोवृद्ध व दिव्यांग व्यक्तींनी घराबाहेर पडू नये व सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.