लोकसभा निकालापाठोपाठ आणि महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावर निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या ११ जागांकरिता निवडणुकीची घोषणा केली आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलैला निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजी ११ जागांकरिता निवडणूक होईल, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. येत्या २७ जुलै रोजी विधान परिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असून या जागा रिक्त होणार आहेत.
याच प्रार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून या ११ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. लोकसभा निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू असल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे.
२५ जून रोजी या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होणार आहे. तर २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जुलै रोजी आहे. तर प्रत्यक्ष मतदान हे १२ जुलै रोजी होणार आहे. १२ जुलै (शुक्रवार) रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान होणार असून मतमोजणी १२ जुलै रोजीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.