सोलापूर : जिल्हा रूग्णालय, पालघर येथील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी सुहास माने (कान, नाक व घसा तज्ञ) यांची सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश नगर विकास विभागाने 7 जुन 2024 रोजी काढला आहे. डॉ. राखी माने या यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पालघर येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्यांना सोलापूर महापालिकेच्या “वैद्यकीय आरोग्य अधिकारी” पदावर प्रतिनियुक्तीने पदस्थापना देण्यात आली आहे. यापूर्वी सदरच्या पदाचे प्रभारी म्हणून कामकाज डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी पाहीले आहे.
सहा महिन्यानंतर आदेश
डॉ. राखी माने यांचे पती डॉ. सुहास माने हे गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर 2023 रोजी सोलापूरात जिल्हा शल्य चिकीत्सक पदी रूजू झाले आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ. राखी माने यांनीही पती-पत्नी एकत्रिकरण मधून सोलापूर महापालिकेतील रिक्त आरोग्य अधिकारी पदी विनंती अर्ज केला होता. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागातील सावळा गोंधळ आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमुळे जाहिर झालेली आचार संहिता यामध्ये सदरची फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर पडून होती. मात्र 4 जून रोजी आचारसंहिता संपल्याने अखेर डॉ. राखी माने यांची ऑर्डर निघाली, परंतु यासाठी त्यांना सहा महिने वाट पहावी लागली.