तेलगांव (सिना ) – येथील विधाता बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने 351 वा शिवराज्याभिषेक दिन आणि विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 155 रक्तदात्यांनी सहभाग घेतला यासाठी अक्षय ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपरावजी माने, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील , संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगव्या ध्वजाचे पूजन दिलीप माने यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीष्ठीत मूर्तीला बाळासाहेब माने यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करुन दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अमृता जयानंद पाटील , ऐश्वर्या बसवेश्वर स्वामी, विराज विष्णू माने आणि अमृता नागनाथ भोई, हर्षदा गंगादर बारडोळे, रितेश अरुण बंडगर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना दिलीपराव माने यांनी संस्थेच्या अकरा वर्षाच्या कार्याचे कौतुक केले शिवराज्याभिषेक साजरा करण्याचे परंपरा संस्थेने गेल्या अकरा वर्षापासून जपून ठेवून त्यात उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचे माने यांनी सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब माने, शिवाजी पाटील , पंकज गुंड,पांडुरंग रोकडे, विठ्ठल लांबपतुरे ,पंडित शेटे , वजीर शेख ,अजय सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी गावातील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णात माने यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.बाळासाहेब माने यांनी मानले .