मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत.
या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरचचंद्र पवार पार्टी या पक्षासाठी लागू होईल का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. यावर पवार यांनी सांगितले की, मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणताही फरक दिसत नाही, वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले.
मात्र, प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकत नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. परंतु, आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचनी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेले हे वक्तव्य अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे. समाजवादी पक्ष, राजद, लोजप, वायएसआरसीपी, टीडीपी आणि भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे. या प्रादेशिक पक्षांच्यादृष्टीने हा स्थित्यंतराचा काळ आहे. हे स्थित्यंतर सुरु असताना अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकत आहेत किंवा त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. परिणामी या प्रादेशिक पक्षांना अस्तित्वासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली जाण्याची गरज वाटत आहे, जेणेकरुन त्यांना अस्तित्वाची लढाई लढता येईल.