येस न्युज नेटवर्क : यवतमाळ येथून मोठी बातमी समोर येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात येणारा सभामंडप कोसळला आहे. यात 4 कामगार जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर येणार असून, त्यांची जाहीर सभा देखील होणार आहे. यासाठी भारी गावात 45 एकर जागेवर मंडप उभारण्यात येत आहे. मात्र, त्यातील एक डोम उभा करण्याचे काम सुरू असतानाच पिल्लर जमिनीतून निखळला. त्यामुळे त्याचे खांब खाली क्रेनवर कोसळले. याठिकाणी काही कामगार देखील होते, परंतु कामगार सुदैवाने बचावले असून,चार जण जखमी झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ जिल्ह्यातील दौरा निश्चित झाला आहे. 28 फेब्रुवारीला पंतप्रधान यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधीत करणार आहे. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात असतानाच एक अपघात घडला आहे. सभेसाठी डोम उभारले जात असतानाच त्याचे तीन पिल्लर खाली कोसळले आहेत. यावेळी तिथे काम करणारे काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहे.