राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सोलापूर-हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू वाहतूक करताना एका इसमास पकडले.
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर-हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड, वय 21 वर्षे, राहणार मुळेगाव तांडा (ता.दक्षिण सोलापूर) हा ऑटोरिक्षा क्रमांक MH 13 CT 8929 मधून रबरी ट्यूबमधून साडेचारशे लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्या ताब्यातून तेविस हजार रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.