सोलापूर – प्रिसिज्न संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसांच्या पहिल्या सत्रात बासरीवादक तेजस विंचूरकर आणि तबलावादक मिताली विंचूरकर या पती पत्नीच्या जोडीने सुरेल सुरवात केली तर दुसऱ्या सत्रात पंडित कैवल्यकुमार यांचे शात्रिय गायन झाले.
सायंकाळी ६.२५. संगीत महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरूवात बासरीच्या सुरांनी झाली. संधीप्रकाशी राग ‘पूरियाकल्याण’ ने तेजस विंचूरकर यांनी प्रारंभ केला. घुमारेदार मंद्रातला निषाद, षड्ज मंद्रसप्तकात केलेला विस्तार, पुरिया आणि कल्याण अंगाच्या मिश्रणाने बढत करताना लावलेला सुंदर मध्यपंचम आणि चमकदार मध्य निषाद व तार षड्ज इत्यादी वैशिष्ट्या्नी केलेली ‘आलापी’ प्रस्तुत केल्यानंतर त्यांनी ‘जोड’ व ‘झाला’ या प्रकारात लयकारीचे सुंदर दर्शन घडवले. फुंकीच्या जिव्हाळी प्रकारात त्यांनी केलेल्या स्वररचनांना रसिकांनी दिलखुलास दाद दिली. मध्यलय झपतालात गत सादर केली. मिताली विंचूरकरांच्या तबल्यावरील स्पष्ट व अवीट गोडीच्या बोलांनी बहार आणली. त्यांनी चाटीच्या बोलाचेही सुमधुर प्रदर्शन केले.
बासरीचे सूर व तबल्याचे बोल एकमेकांत मिसळून जात राहिले आणि रसिकांना या दाम्पत्याच्या सहवादनाचाही आनंद मिळाला.त्यानंतर त्यांनी द्रुत तीनतालात ‘बहुत दिन बिते’ ही बंदिश गायकी अंगाने सादर केली.
त्यानंतर त्यांनी राग ‘देस’ सादर केला.देसमध्ये द्रुत तीनतालात वादन केले.देस मधील अतिद्रुत वादनातील कामगतीला रसिकांनी मनमुराद दाद दिली.
प्रारंभी प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा व संचालक करण शहा यांच्या हस्ते कलाकारांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले.
तेजस विंचूरकर आणि मिताली विंचूरकर या दाम्पत्याच्या सहवादनाबद्दल बोलताना माधव देशपांडे यांनी आज आपण कृष्णाचा पावा आणि राधेचा तबला ऐकणार आहोत असा उल्लेख करताच श्राेत्यांमध्ये सुखद हास्यकल्लोळ उसळला.
सत्र दुसरे
डाॅ. सुधांशु चितळे, डॉ. किरण चितळे, डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते दुस-या सत्रातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. पं. कैवल्यकुमार गुरव यांनी आपल्या गायनाची सुरूवात मारूबिहाग रागाने केली. प्रारंभी मंद्र सप्तकातील धीरगंभीर आलापातून मध्य सप्तकात प्रवेश करून त्यांनी ‘अब हूँ न जाऊँ’ या विलंबित एकतालातील बंदिश सादर केली. व्हाईस कल्चरचा विशेष अभ्यास केलेल्या कैवल्यकुमार यांचा स्वरलगाव व मारूबिहागा सारखा लोकप्रिय राग , तारसप्तकातील अत्यंत स्वच्छ व नितळ स्वरलगाव, दीर्घ दमसास आणि दाणेदार तानांच्या लडी यामुळे मारूबिहागाने वातावरण भारून गेले. द्रुत तीनतालात त्यांनी ‘सखी बित जाये’ ही बंदिश खास ढंगाने सादर केली.
त्यांना संवादिनीची स्वरूप दिवाण, तबल्याची प्रशांत पांडव यांनी सुंदर साथसंगत केली. तानपु-यावर विश्वास शाई वाले, तानपु-यावर उदय कदम, विश्वास शाईवाले यांनी साथसंगत केली.